मराठवाडयाला हक्काचे पाणी मिळावे या व अन्य समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व भाजपच्या वतीने आज औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
मराठवाडा सुजलाम् सुफलाम् व्हावा हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे स्वप्न होते. कृष्णा खो-याचं पाणी आणण्याचं काम त्यांनीच केलं. मराठवाड्याच भाग्य उजळावं, इथल्या प्रश्नांची उकल व्हावी, प्रकल्पांना न्याय मिळावा यासाठी सरकारने कॅबिनेटची एक बैठक मराठवाड्यात घ्यावी अशी मागणी केली. हे उपोषण माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी, मराठवाडयातील जनतेच्या पाण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आहे.
मी भाजप सोडणार नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सकारात्मक भावनेतून हे उपोषण केले आहे. हे उपोषण कोणत्याही पदासाठी किंवा अपेक्षांसाठी नाही, तुमच्या बळावर हे उपोषण करत आहे, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापुढे समाजसेवक म्हणून काम करणार असून जनतेसाठी लढा देणार आहे. तुमच्या मनात माझे स्थान असेच कायम अबाधित ठेवा.
मराठवाडयाला हक्काचे पाणी मिळावे, सिंचनाची तूट भरून काढून इथल्या शेतक-यांना चांगले दिवस आले पाहिजेत, शेती मालाला रास्त भाव मिळाला पाहिजे, तरूणांना रोजगार मिळावा यासाठी सरकारने कॅबिनेटची एक बैठक इथे घ्यावी. मला कुणावरही टीका करायची नाही की दुषणं द्यायची नाहीत. सरकार अजून नवं आहे, त्यांना सत्तेवर येऊन शंभर दिवस झाले आहेत. मराठवाड्याने आजच्या सत्ताधा-यांना भरपूर दिलं आहे त्यामुळे या भागाचे प्रश्न हे सरकार सोडवेल अशी अपेक्षा आहे, लवकरच यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन प्रश्न मांडणार आहे. भविष्यात दखल घेतली गेली नाही तर टीका करायलाही मागे पुढे पहाणार नाही. मराठवाडा ही माझी कर्मभूमी आहे, इथल्या जनतेसाठी आम्ही केलयं आणि म्हणूनच ताठ मानेने न्याय मागण्यांसाठी उपोषण करतेय.
माझ्या पराभवाने तुम्ही दुःखी झालात, हे मी समजते पण डळमळून जाऊ नका, एखाद्या पराभवाने खचून जाणारी मी नाही, तुम्ही माझी संपत्ती आहात. सकारात्मक भावनेतून केलेले हे उपोषण आक्रमक होणार नाही याची काळजी सरकार घेईल. माझ्या भाषणानंतर एका लहान मुलीच्या हस्ते मला पाणी देऊन उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली.
उपोषणाला दुपारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, ”मराठवाड्याचं पाणी हे मराठवाड्याला मिळालंच पाहिजे, आम्ही चालू केलेली काम जर तुम्ही पुढे नेली तर तुम्हाला समर्थन देऊ, पण मराठवाड्याचं पाणी थांबवाल तर खबरदार,दुष्काळमुक्त मराठवाडा हे गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न होते, जर मराठवाड्याचे पाणी थांबवण्याचा प्रयत्न केलात, तर संपूर्ण मराठवाडा रस्त्यावर उतरेल”. तुम्हाला क्रेडिट हवं असेल तर घ्या, नाव बदलायच तर बदला, अजून काही बदल करायचे ते करा पण ही योजना मराठवाड्यासाठी आहे.योजना रद्द केली तर रस्त्यावर उतरून लढाई लढू असं फडणवीस म्हणाले.
पंकजाताई मुंडे यांचे उपोषण जनतेसाठी आहे, राजकीय फायद्यासाठी नाही असे सांगत बीडच्या खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी टीका करणारांचा समाचार घेतला. आताच्या सत्तेमधील मंत्र्यांनी विरोधी पक्षात असताना विकासा साठी एकतरी मोर्चा काढला का? त्यावेळी जनतेसाठी का पुढे आला नाहीत अशा शब्दांत टीकास्त्र सोडले. पंकजाताई ज्यावेळी बीड जिल्हयात भाजपच्या एकटया आमदार होत्या त्यावेळी वैद्यनाथ पॅटर्नच्या माध्यमातून जलसंधारणाची मोठी चळवळ उभा केली, सत्ता आल्यानंतर यातूनच त्यांनी जलयुक्त शिवार सारखी योजना यशस्वीपणे राबवली, लोक सहभाग वाढवला त्यामुळे भाजपच्या काळात पाणी प्रश्नांवर काम झालं नाही हे म्हणणं अयोग्य असल्याचे त्या म्हणाल्या.
आजच्या लाक्षणिक उपोषणाला मराठवाड्यातील अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा देऊन सहभाग घेतला. मराठवाडा जनता विकास परिषद, राष्ट्रीय चर्मकार महासंघ बीड, सरपंच परिषद, शिक्षक आघाडी, माजी सैनिक संघटना, वंजारी सेवा संघ, शिवक्रांती सेना, मराठवाडा विकास कृती समिती, सकल धनगर समाज, इंजिनीअर्स अॅन्ड मॅनेजमेंट फोरम, तेली समाज सेना, सुलक्ष्मी बहूउद्देशीय सेवाभावी संस्था, उदयगिरी विश्वकर्मा संघटना आदींसह अनेक ग्रामपंचायती व सामाजिक संस्थांनी पाठिंबा देऊन या लढयात आम्ही तुमच्या सोबत असल्याचा विश्वास दिला. उपोषणास मराठवाड्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपच्या वतीने विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
No comments:
Post a Comment